महागाव नगरपंचायत हद्दीत अनधिकृत खोदकाम; वार्ड क्रमांक १४ मध्ये जीवितास धोका

महागाव (प्रतिनिधी) संजय नागरगोजे
— महागाव नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक १४ मध्ये अनधिकृत खोदकाम केल्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. नगरपंचायत हद्दीतील खुल्या जागेत व रस्त्यावर टॉवर उभारणीसाठी सुमारे १५ फूट खोल व २० फूट रुंद असा मोठा खड्डा बेकायदेशीररीत्या खोदण्यात आला होता.
सदर टॉवर अतिक्रमित व बेकायदेशीर जागेवर उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, नगरपंचायत कार्यालयामार्फत संबंधितांना तात्काळ काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली. लगतच्या प्लॉटचे मालक जगदीश नरवाडे, तसेच पाटील कन्स्ट्रक्शन व इंडस टॉवर, नागपूर (टॉवर कंपनी) यांना दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी नोटीस देऊन काम बंद करण्यात आले.
मात्र, काम थांबवण्यात आले असले तरी सदर खड्डा अद्याप बुजवण्यात आलेला नाही. हा खड्डा थेट रस्त्यावर असल्याने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक किंवा दुचाकी/वाहनचालक त्यात पडून गंभीर अपघात अथवा जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर बाबीची तक्रार व मागणी विशाल डहाळे यांनी नगरपंचायत विभागाकडे लेखी स्वरूपात केली आहे. बेकायदेशीर टॉवर उभारून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची बाब नगराध्यक्षांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करून काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिक्रमित जागेवर खोदण्यात आलेला खड्डा तात्काळ बुजवावा, अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अपघातास संबंधित ठेकेदार, टॉवर कंपनी व संबंधित मालक जबाबदार राहतील, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
—



