Uncategorized

रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत एस.पी.एल.एस.च्या विद्यार्थ्यांनी दाखवली कलेची दैदीप्यमान झलक

एस.पी. दळवी
उमरखेड

रंगोत्सव सेलिब्रेशन संस्था, मुंबई यांच्या विद्यमाने स्थानिक संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सव स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेची, सर्जनशीलतेची व सुप्त कलागुणांची दैदीप्यमान झलक सादर केली. या स्पर्धेत शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विविध बक्षिसांचे मानकरी होण्याचा गौरव मिळविला आहे.

रंगोत्सव सेलिब्रेशन संस्था, मुंबई यांच्यावतीने दरवर्षी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला स्पर्धांचे आयोजन करण्यात येते यामध्ये चित्रकला, रंग भरा, ग्रीटिंग कार्ड बनविणे, मास्क बनविणे, सुंदर हस्ताक्षर, बोटांचे ठसे, आदी स्पर्धांचा समावेश असून या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते.

यावर्षी स्थानिक संस्कार पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपले कौशल्य प्रभावीपणे सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपले मानाचे स्थान पटकाविले आहे.

रंगोत्सव स्पर्धेचे समन्वयक हर्षवर्धन हलगे, कला शिक्षक राजेंद्र मस्के व शुभम जामकर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्राँझ मेडल, प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ बक्षीस अशी एकूण जवळपास १३३ बक्षिसे मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. या बक्षिसांचे वितरण शालेय स्तरावर उत्साहात पार पडले.

विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शाळेच्या संचालक मंडळ, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी तसेच शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे व समन्वयकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कला क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button