शेतकऱ्यांच्या मोटारी बंद, उद्योगाचा पाणीउपसा सुरूच!
दुष्काळाच्या सावटात वेणी धरणातून नॅचरल शुगरला पाणी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर सवाल

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असताना पाणीवापराबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तलावांमधून शेतीसाठी पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्यात आल्या असताना, दुसरीकडे वेणी धरणावरून नॅचरल शुगर कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाणीवापराबाबत प्रशासनाचे नियम सर्वांसाठी समान आहेत का, असा सवाल शेतकरी व नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
महागाव तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक भागात पिके करपण्याच्या स्थितीत असून आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी प्रशासनाने विविध जलस्रोतांवरील पाणीउपशावर निर्बंध घातले आहेत.
बेलदरी तलावावरील शेतकऱ्यांच्या पाणीउपसा करणाऱ्या मोटारी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सेनंद व बोथा परिसरातील तलावांवरील काही मोटारी अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे वेणी धरणातून साखर कारखान्यासाठी पाणीउपसा सुरू असल्याने प्रशासनाच्या कारवाईच्या निकषांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीउपशावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा सुरू असल्याचे निदर्शनास येत असल्याने आदेशांची अंमलबजावणी समान पद्धतीने होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करून त्यांच्या शेतीला पाणी मिळण्यावर निर्बंध आणि दुसरीकडे उद्योगासाठी पाणी सुरू ठेवण्याची नेमकी भूमिका काय? असा थेट सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे उपलब्ध स्रोत जपणे आणि त्याचे समान व न्याय्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वेणी धरणातून उद्योगासाठी सुरू असलेला पाणीउपसा कोणत्या आदेशाच्या आधारे सुरू आहे, त्याचे प्रमाण किती आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पाणीउपसा निर्बंधाच्या आदेशातून उद्योगाला कोणती सवलत देण्यात आली आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करण्याची कारवाई होत असेल, तर उद्योगाच्या पाणीउपशाबाबतही समान निकष लागू केले जाणार का? याकडे आता महागाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



