
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव : संजय नागरगोजे
महागाव पोलिस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या पासपोर्ट आकारातील छायाचित्रांसह सूचनाफलकावर कौतुकाची नोंद करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचे लक्ष या उपक्रमाकडे वेधले जात असून, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिकरित्या प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी महागाव पोलिस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फोटो सूचनाफलकावर लावून त्यांचा गौरव करण्याची अभिनव पद्धत सुरू करण्यात आली आहे.
‘चांगले काम करा, तुमचेही कौतुक होईल’ असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये आपलीही उत्कृष्ट कामगिरी व्हावी आणि आपले छायाचित्र सूचनाफलकावर झळकावे, यासाठी काम करण्याची प्रेरणा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे ही वरिष्ठ अधिकाऱ्याची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी हा उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेण्याची सकारात्मक संस्कृती महागाव पोलिस ठाण्यात निर्माण केली आहे.
पोलिस ठाण्यात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचेही या सूचनाफलकाकडे लक्ष जात असून, ‘काम करणाऱ्यांचा सन्मान’ ही भूमिका निश्चितच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



