ढाणकीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस; चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला!
चार-पाच वर्षांच्या बालकाला कुत्र्यांनी घेतले लक्ष्य; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
ढाणकी शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरत असून, चार ते पाच वर्षांच्या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरातील विविध भागांत बेवारस, मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. यापूर्वीही चार-पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
चिमुकल्यावरील हल्ल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
लहान मुलावर झालेला हल्ला ही केवळ एक घटना नसून, शहरातील सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचे नगरपंचायतीला निवेदन
या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शेख जमीर शेख बशीर यांच्यासह नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे ढाणकी शहरातील बेवारस, मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा कायदेशीर आणि नियमानुसार तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील ज्या भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे, त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच केवळ आश्वासने अथवा कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष कारवाई करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी योग्य नियोजन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे प्रशासनाची जबाबदारी
शहरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोकाट कुत्र्यांच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण, कायद्यानुसार आवश्यक कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे.
चिमुकल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तरी प्रशासनाने जागे होऊन या समस्येकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
निवेदनावेळी नागरिकांची उपस्थिती
यावेळी शे. मजहर शे. महबूब, सोहेल कुरेशी, शे. अहेदाद शे. रफीक, शे. शाहबाज शे. मसूद, शे. समीर शे. नदीम, सरफद नवाज सरफद सत्तार, शे. उजेल शे. मुस्ततार, शे. अफसर शे. गौस मुन्नावर, रहमान ( नगरसेवक), शेख जमीर भाई, (एम आय एम कार्यकर्ता), जफर भाई, बबलू भाई, साहिल भाई, मजर बाबरी, समीर भाई, हर्षद भाई, आदी नागरिक उपस्थित होते.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



