बाजार समिती गेटवरील जबरी चोरीचा छडा; झारखंड-बिहार कनेक्शन असलेली टोळी जेरबंद

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
१० चोरीचे मोबाईल व कारसह तब्बल ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त; उमरखेड डी.बी. पथकाची कौतुकास्पद कामगिरी
उमरखेड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर वृद्धाला मारहाण करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या टोळीचा उमरखेड पोलिसांनी अवघ्या काही काळात छडा लावला आहे. गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून चोरीचे एकूण १० मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता दयानंद कॉलनी येथील सेवानिवृत्त इंजिनियर विठ्ठल नागोराव मोहकर (वय ६४) हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर उभे असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना पकडले. त्यापैकी एका आरोपीने त्यांच्या गालावर थप्पड मारून खिशातील विवो कंपनीचा मोबाईल जबरीने काढून घेतला आणि पसार झाले. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९१/२०२६ अन्वये कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरखेड आठवडी बाजारात वारंवार होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आरोपींचा शोध घेऊन मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना तपासाची जबाबदारी दिली.
डी.बी. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर एम.एच. ३६१ नागपूर-तुळजापूर महामार्गावरील मार्लेगाव फाटा परिसरात आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख तालीम शेख आयुब (वय २८, रा. डाकबंगला मोतीझरना, जि. साहेबगंज, झारखंड), मकसूद आलम इदवाह आलम (वय २१, रा. नासिरगंज पुरब टोला, जि. कटिहार, बिहार) आणि वसीम अक्रम शेख अब्दुल रज्जाक शेख (वय ३२, रा. तोहीदनगर, बडा माजगाव, अयोध्यानगर, नागपूर) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून फिर्यादीचा मोबाईल तसेच चोरीचे इतर मोबाईल असे एकूण १० मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली एम.एच.४९/सी.एस.२४४५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६,१६,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे उमरखेड शहर व आठवडी बाजार परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर मोठा आघात झाला असून, या टोळीने आणखी कुठे अशा प्रकारच्या चोरी केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव कार्यदेपाटील आणि उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पतंगे, पोलीस हवालदार अतुल तांगडे, चंदन जाधव, गिरीष बेंद्रे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संघशिल टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महाळनवर व हनुमंत मुसळे यांनी यशस्वीपणे पार पाडली. अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्रीकांत जिंदमवार व पोलीस हवालदार विशाल भगत यांनीही तपासात सहकार्य केले.
गुन्ह्याचा पुढील तपास डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



