टेंभुरदरा येथे सागवान वृक्षांची अवैध कटाई करणारा जेरबंद! सेनंद बीटमध्ये सागवान चिराण मालाचा साठा जप्त; वनविभागाची कारवाई

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव वनपरिक्षेत्रांतर्गत सेनंद बीटमधील टेंभुरदरा गावात अवैधरित्या सागवान वृक्षांची तोड करून चिराण मालाचा साठा केल्याप्रकरणी वनविभागाने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. परसराम बबन टारपे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वन कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी सेनंद बीटमध्ये गस्त घालत असताना टेंभुरदरा गावातील जंगल परिसरात सागवान वृक्षांची अवैध तोड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, परसराम टारपे यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता सागवान जातीचा चिराण मालाचा साठा आढळून आला. सदर माल फर्निचरसाठी वापरण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
वनविभागाने सागवान चिराण माल जप्त करून टारपे यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. त्यांच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जंगल परिसरातील नेमक्या कोणत्या ठिकाणाहून सागवान वृक्षांची तोड करण्यात आली, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. या तपासासाठी आरोपीला वन कोठडी मिळावी, यासाठी न्यायालयात मागणी करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
काही दिवसांपूर्वी दगडथर जंगल परिसरातही अवैध वृक्षतोडीविरोधात कारवाई करण्यात आली होती. महागाव तालुक्यात ग्रामीण भागात अवैधरित्या सागवान कटाई व फर्निचर व्यवसाय सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने गस्त आणि तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
ही कारवाई महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक व वनविभागाच्या पथकाने केली.



