महागावातील देशी दारू दुकानावर नियमभंगाचे आरोप चिल्लर परवाना असताना पेट्यांची विक्री? धनोड्यात ३० पेट्या जप्त; दुकानाच्या परवान्याची चौकशी करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे :
महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एस एच 29 C B 262 नंबरची गाडी देशी मालकाची असून संबंधित दुकानाकडे चिल्लर विक्रीचा परवाना असताना पेट्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री करून ती गावोगावी पाठविली जात असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
निर्धारित वेळेचे पालन न करता रात्री उशिरापर्यंत तसेच सकाळच्या वेळीही दारूचा साठा बाहेरगावी पाठविला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन मुलांना दारू विकली जात असल्याच्या आरोपाचीही संबंधित विभागाने गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
धनोड्यात ३० पेट्या पकडल्याने प्रश्नचिन्ह
२५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता धनोडा येथे एलसीबी पथकाने ३० पेट्या देशी दारू पकडल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा धनोडा येथे कोणत्या दुकानातून आला, याची चौकशी अद्याप का करण्यात आली नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
पकडण्यात आलेल्या दारूच्या पेट्या कोणत्या परवानाधारक दुकानातून खरेदी करण्यात आल्या, त्याची विक्री नोंद काय आहे आणि संबंधित दुकानाच्या स्टॉकमध्ये त्याची नोंद आहे का, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दुकान सील करून परवाना रद्द करण्याची मागणी
महागाव शहरातील संबंधित देशी दारू दुकानाच्या स्टॉक रजिस्टर, विक्री नोंदी, परवाना, सीसीटीव्ही फुटेज आणि धनोड्यात पकडलेल्या दारूच्या साठ्याचा स्रोत यांची तातडीने चौकशी करावी. नियमभंग आढळल्यास दुकान सील करून परवाना रद्द करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दारूबंदी विभागाचे आयुक्त व सचिव यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. महागावातील देशी दारू दुकानातून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत आहे का, याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यास सत्य परिस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संबंधित दुकानमालक व दारूबंदी विभागाची बाजू या आरोपांबाबत अद्याप समोर आलेली नाही.



