शहर

हल्ल्याच्या सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करा; रमेश चव्हाण यांची मागणी, पत्रकार परिषदेत भाजपातील बड्या नेत्यावर गंभीर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

उमरखेड : माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असून, हल्ल्याचा कट नेमका कोणी रचला याचा सखोल तपास करून सूत्रधारासह सर्व संबंधितांना अटक करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते रमेश चव्हाण यांनी केली. हल्ल्यापूर्वी धमक्या मिळाल्या होत्या, तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
२५ ऑगस्ट रोजी उमरखेड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तपास प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव, बसवेश्वर क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, ते मागील ३३ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. पक्षातील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर अलीकडील काळात पक्षातील कथित एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी भूमिका घेतली. जिल्हा परिषद मालकीच्या जमिनीबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यामुळे धमक्या मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या काळात पुसद येथील एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतरही धमक्या आल्याचे त्यांनी सांगितले.
१७ जून रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता नाथनगर परिसरातून दुचाकीवरून घरी जात असताना चार ते पाच जणांनी चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा दावा चव्हाण यांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
जबाब फाडल्याचा गंभीर आरोप
रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांनी आपला जबाब नोंदविल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्या जबाबात काही व्यक्तींची नावे नमूद केल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, ठाणेदार शंकर पांचाळ यांनी तो जबाब पाहिल्यानंतर ‘बयान चुकले आहे’ असे सांगून तो फाडून टाकल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपण जबाब देण्याच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट केले असतानाही पुन्हा जबाब घेण्याची प्रक्रिया का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संबंधित जबाबात काही राजकीय व्यक्तींची नावे येऊ नयेत, या उद्देशाने हस्तक्षेप झाला का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
CDR तपासा, हल्ल्याचा कट उघड करा!
हल्ल्यातील आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), हल्ल्यापूर्वीचे फोन संपर्क, संशयित व्यक्तींशी असलेले संबंध आणि हल्ल्यापूर्वीची हालचाल यांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. केवळ हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता, त्यामागील आर्थिक, राजकीय किंवा अन्य कारणांचा तपास करून हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण, हे जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव यांनीही पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

चौकट : ‘पोलिसांची भूमिका संशयास्पद?’ — ॲड. जाधव
ॲड. संजीवकुमार जाधव यांनी दावा केला की, रमेश चव्हाण यांचा जबाब घेत असताना ठाणेदार शंकर पांचाळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून फोन चव्हाण यांच्या कानाला लावला. तसेच संबंधित जबाबात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे नाव घेऊ नये, असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या आरोपांची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी होऊन जबाब नोंदविण्याची संपूर्ण प्रक्रिया, उपलब्ध रेकॉर्ड, संबंधित पोलिसांचे मोबाईल/कॉल तपशील आणि तपासातील कागदपत्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

आता प्रश्न केवळ हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अटकेचा नाही; तर या हल्ल्यामागे कोणाचा कट होता आणि सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार का, हा खरा सवाल आहे. संबंधित आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक असून, दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button