महागाव हद्दीत अवैध देशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका चारचाकीसह ३० पेट्या बॉबी संत्रा देशी दारू जप्त; ६.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महागाव : यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील धनोडा येथे अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत टाटा टियागो EV चारचाकीसह तब्बल ३० पेट्या बॉबी संत्रा देशी दारू असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच आरोपी शोध व अवैध धंद्यांविरोधातील कारवाईसाठी गस्त घालत होते. त्यावेळी धनोडा येथे एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह धनोडा येथे सापळा रचून टाटा टियागो EV क्रमांक MH-29-CB-2623 या वाहनाची झडती घेतली. वाहनामध्ये १० पोती आढळून आली. प्रत्येक पोत्यात तीन पेट्या, अशा एकूण ३० पेट्या होत्या. प्रत्येक पेटीत ९० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या असल्याने एकूण ३,००० नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत १ लाख २० हजार रुपये, तर वाहनाची किंमत धरून एकूण मुद्देमाल ६ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मनोज परसराम कदम (वय ४०, रा. गणपती चौक, वॉर्ड क्रमांक १६, महागाव) याच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा इशारा!
यवतमाळ जिल्ह्यात अवैध दारू, अवैध शस्त्रसाठा, अवैध उत्खनन तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला प्रभावी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली.
अवैध दारूचा साठा आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधातील या कारवाईमुळे महागाव परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवायांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



