शहर

महागाव – राष्ट्रवादीत असंतोष; स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्षाची कार्यकर्त्यांची नाराजी

महागाव प्रतिनिधी │ संजय नागरगोजे

महागाव–पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मजबूत अस्तित्व असूनही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या स्थानिक पातळीवरील कमी संपर्कामुळे पक्षात नाराजी वाढत आहे. महागाव तालुक्यातील काही गावे पुसद विधानसभा क्षेत्रात येत असली तरी, तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद कमी असल्याची तक्रार होत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा आहे.

तालुक्यात पक्षाला केवळ दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही कार्यकर्ते भाजपात गेले तर काही जण शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे गोंधळाचे वातावरण कायम आहे.

एकेकाळी मनोराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महागाव तालुक्यातील बाजार समिती, सहकारी संस्था, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह अनेक संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. चौधरीसाहेब, शिवाजी राठोड, सिताराम ठाकरे, विजय महाजन, साहेबराव पाटील यांसारख्या नेत्यांनी सहकार क्षेत्रात भक्कम कामगिरी केली होती. मनोराव नाईक यांच्या प्रभावामुळे उमरखेड–महागाव मतदारसंघात पक्षाचा धबधबा होता. मात्र आज युवकांना पुढे न आणणे, नवे चेहरे न प्रोत्साहित करणे आणि सरसकट संपर्क न ठेवणे याबाबत टीका होत आहे.

“गाव पातळीवर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष आणि तरुणांना संधी न मिळणे” हे नाराजीचे प्रमुख मुद्दे असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील यवतमाळ मेळाव्यास महागावातील अनेक कार्यकर्त्यांना निमंत्रण न मिळाल्याने रोष वाढला असून, निवडक मंडळींनाच महत्त्व दिल्याचे आरोप आहेत.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आजही मनोराव नाईक यांच्या कुटुंबाबद्दल निष्ठा असलेले अनेक कार्यकर्ते पक्षात आहेत. इंद्रनील नाईक यांनी युवकांना संधी देत संघटन पुनरुज्जीवित केले तर पुन्हा एकदा मतदारसंघात राष्ट्रवादी मजबूत होऊ शकते. पक्षात बदल आणि संघटन मजबुती अनिवार्य असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button