शहर

ऑनलाइन सोयाबीन नोंदणी सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

महागाव प्रतिनिधी │ संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ऑनलाईन खरेदी नोंदणीसाठी खरेदी-विक्री संघाकडे चकरा मारत आहेत. मात्र अद्यापही सोयाबीनची ऑनलाइन खरेदी प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “खरेदी संघाने जिल्हा फेडरेशनकडे योग्य पाठपुरावा केला नसल्यामुळे नोंदणी अडकली आहे,” अशी तक्रार शेतकरी नेत्याांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हा फेडरेशनकडून ऑनलाइन खरेदी बाबत कोणताही अधिकृत आदेश प्राप्त नसल्याचे संघाकडून सांगण्यात येत असून, त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ऑनलाइन नोंदणी सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे धाव घ्यावी लागत असून ३५०० ते ४२०० रुपये दरम्यान सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी व्यापाऱ्याकडून कोणतीही पावती न दिल्याने व्यवहार अनधिकृत राहतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती व सहकार विभागाकडून व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची टीकाही शेतकरी करत आहेत. “व्यापारी दुकानातूनच सोयाबीन खरेदी करीत आहेत, अधिकृत खरेदी केंद्रांवर खरेदी होत नाही,” असा आरोपही करण्यात आला आहे.

सध्याचे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विलास पवार यांनीही ऑनलाइन खरेदीविषयी जिल्हा फेडरेशनशी अधिकृत पत्रव्यवहार न केल्याचे समोर आले आहे. परिणामतः जिल्हा फेडरेशन आणि स्थानिक संघ यांच्यातील समन्वयाअभावी सर्वात मोठा तोटा शेतकऱ्यांना होत आहे.

ऑनलाईन नोंदणी तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी नेत्यांकडून करण्यात येत असून, प्रक्रिया सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा फेडरेशनने त्वरीत आदेश देऊन खरेदी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी आहे.

—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button