रखडलेल्या पुलासह रस्त्यांच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक; लोकप्रतिनिधींवर दुर्लक्षाचा आरोप

महागाव,प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील गुंज–माळेगाव मार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामामुळे तसेच खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रभावी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गुंज–माळेगाव मार्गावरील पुलाच्या आराखड्यातील त्रुटीमुळे सुमारे चार वर्षांपासून पुलाचे काम रखडले आहे. पर्यायी वळण रस्ताही पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने सुमारे २५ गावांचा संपर्क प्रभावित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या प्रकरणात संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दोषी आढळल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी आणि शासनाच्या निधीची वसुली करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, उमरखेड मतदारसंघाचे आमदार किसन वानखडे, मंत्री इंद्रनील नाईक आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गुंज–महागाव रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि रखडलेले पूल याविरोधात गुंज व सवना परिसरातील नागरिकांनी यापूर्वी तहसीलदारांकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सामाजिक माध्यमांमुळे नागरिक अधिक जागरूक झाले असून, विकासकामांबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भूमिका घेत आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मूलभूत प्रश्न सुटल्याशिवाय मतदानाचा विचार करणार नसल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.



