खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा; डायल ११२ वर खोटा कॉल महागात

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
डायल ११२ या आपत्कालीन सेवेला खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी महागाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी डायल ११२ वर ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार संदीप तळांडे यांना महागाव तालुक्यातील उटी येथील अनिल साहेबराव वानखेडे (वय ४०) यांनी त्यांच्या मोबाईलवरून फोन करून उटी गावात जुगार सुरू असल्याची माहिती दिली.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी महागाव पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, तेथे कोणत्याही प्रकारचा जुगार सुरू नसल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांकडूनही अशी कोणतीही घटना नसल्याचे सांगण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी डायल ११२ वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल महागाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा क्रमांक ५७/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९२ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल ११२ ही आपत्कालीन सेवा केवळ खऱ्या व तातडीच्या प्रसंगांसाठीच वापरावी. खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेचा वेळ व संसाधनांचा अपव्यय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, यापूर्वी महागाव परिसरात बंदुकीचा धाक दाखवून कथित अपहरण झाल्याची लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्या प्रकरणात पुढे कोणती कारवाई झाली किंवा तपासाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात महागाव पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप उपलब्ध झालेली नाही.



