उमरखेडच्या राजकारणात राष्ट्रवादीचा नवा दम!राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्ताराला नवी दिशा

देविदास राठोड यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती; पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश
प्रवीण इंगळे ..उमरखेड तालुका प्रतिनिधी
उमरखेड, ता. २६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) उमरखेड तालुक्यात संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने आयोजित पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. याच वेळी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते देविदास राठोड यांची उमरखेड तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामाकर यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष शंकर तालंकर, तालुका कार्याध्यक्ष प्रकाश राठोड, सतीश सव्वाशे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वनिता चव्हाण, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शाहरुख पठाण तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी, “उमरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि जनाधारयुक्त करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवावी,” असे आवाहन केले. नव्या नियुक्त्या आणि पक्षप्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक विस्ताराला नवी गती मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



