दगड फोडणारा हात रोजगारासाठी रिकामा; वडार समाजाचा थेट प्रशासनाला धडक इशारा!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि हक्काच्या रोजगाराअभावी हिमायतनगर परिसरासह जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त प्रवर्गातील वडर समाजावर आज पुन्हा एकदा कुटुंबासह परजिल्ह्यात स्थलांतर करण्याची भीषण वेळ आली आहे. या स्थलांतरामुळे निष्पाप मुलांचे शिक्षण अर्धवट सुटत असून, संपूर्ण समाज प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि वडार समाजातील गरीब व भूमिहीन कुटुंबांचे स्थलांतर तातडीने रोखण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते राजू देवकर व नगरसेवक प्रतिनिधी संतोष मुदेवाड यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर येथील तहसीलदार पल्लवी टेमकर यांना हक्काच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
दुष्काळाच्या या कठीण काळात हिमायतनगर आणि ग्रामीण भागातील वडार समाजाचा पारंपरिक दगड फोडण्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून, कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने ऑक्टोबर ते जून या संपूर्ण दुष्काळी कालावधीत प्रत्येक गावात ‘मनरेगा’ अंतर्गत मजुरांना मागणीप्रमाणे तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मुख्य मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच स्थानिक पातळीवर जलसंधारण आणि रस्ते विकासाची कामे सुरू करून स्थानिक मजुरांच्या हाताला काम देण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे.
समाजाला कायमस्वरूपी स्थैर्य मिळवून देण्यासाठी भूमिहीन कुटुंबांना नियमानुसार प्रति कुटुंब ५ एकर शासकीय जमीन कसण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करणे शक्य होईल. यासोबतच, समाजातील वंचित कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून विशेष कृती आराखडा तयार करावा, विद्यार्थ्यांना तालुका पातळीवर वसतिगृहांची सोय करून शिक्षणामध्ये सवलती द्याव्यात आणि ‘वैयक्तिक वडार वाडी वस्ती सुधार योजना’ तात्काळ लागू करावी, अशा मागण्यांनी आता जोर धरला आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक जोड देण्यासाठी शासकीय योजना आणि बँकेमार्फत सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करत, प्रशासनाने यावर तात्काळ पावले न उचलल्यास समाजबांधवांना तीव्र संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू देवकर व नगरसेवक प्रतिनिधी संतोष मुदेवाड यांनी दिला.
यावेळी मारोती मिरेटकर, संजय बाबूलकर, गणेश गायकवाड, बाबुशा कोठेकर, राजू कोठेकर, शंकर गायकवाड, राजू गायकवाड, अर्जुन गायकवाड, महेश गायकवाड, चंदू चव्हाण, सिनु गायकवाड, श्याम देवकर यांच्यासह वडार समाजातील इतर सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



