हिमायतनगर : जिल्हा बँक निवडणुकीत माधवराव पाटील जवळगावकर यांचा १ मताने थरारक विजय; समर्थकांत प्रचंड जल्लोष

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी विशाल राठोड यांचा अवघ्या एका मताने दणदणीत पराभव केला. या ऐतिहासिक निकालानंतर शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत असून ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
या चुरशीच्या निवडणुकीतील प्रत्येक मत अत्यंत निर्णायक ठरले. अवघ्या एका मताच्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वावर जनतेचा व मतदारांचा पुन्हा एकदा ठाम विश्वास असल्याचे सिद्ध झाले आहे.
या राजकीय घडामोडींवर माहिती देताना काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “या विजयामुळे माधवराव पाटील जवळगावकर यांच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील दावेदारीला मोठे बळ मिळाले असून, हा निकाल आगामी स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या विजयाचे वृत्त समजताच लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, समद खान, अब्दुल अखिल शहराध्यक्ष संजय माने, इलियास भाई आणि योगेश चिलकावार या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून जवळगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षपदाची अधिकृत निवड प्रक्रिया आगामी काळात पार पडणार असली, तरी या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून सर्वांचे लक्ष पुढील घडामोडींकडे लागले आहे.



