शहर

अवघ्या ३ तासांत जबरी चोरीचा थरार संपला!स्थानिक गुन्हे शाखेची विजेच्या वेगाने कारवाई; आरोपी जेरबंद, १०० टक्के मुद्देमाल जप्त

₹१४,५०० रोख रक्कम, पल्सर दुचाकी व मोबाईलसह ₹८४,५०० चा मुद्देमाल हस्तगत

| उमरखेड वार्ता सहसंपादक शेख मुजाहिद

पुसद शहरात भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा अवघ्या तीन तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने आरोपीला जेरबंद करून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आरोपींमध्ये धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी स्मार्ट बाजार परिसरात आझाद लतीफ सय्यद (वय ६५, रा. जामबाजार, ता. पुसद) हे महाराष्ट्र बँकेतून ₹१४,५०० काढून घरी जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना अडवून झटापट केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७८/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे तसेच पुसद शहरचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक सक्रिय करण्यात आले.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आरोपी फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुसद बसस्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आनंद विलास पवार (वय २०, रा. आरंभी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) असे असून त्याच्याकडून चोरीस गेलेली ₹१४,५०० रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹८४,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुसद शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, सहाय्यक फौजदार संतोष भोरगे, पोलीस हवालदार सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली.

वेगवान तपासाचे पुन्हा एकदा दर्शन
गुन्हा घडल्यानंतर केवळ तीन तासांच्या आत आरोपीला अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या जलद आणि परिणामकारक कारवाईबद्दल पोलीस दलाचे नागरिकांकडून कौतुक होत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button