अखेर मलकापूर-तिवरंग रस्त्याची पोलखोल; ‘काम पूर्ण’ फलक लावूनही रस्ता अपूर्णच असल्याची अधिकृत कबुली

महागावप्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील एमडीआर-42 तिवरंग ते मलकापूर या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. जुलै 2026 मध्ये काम पूर्ण झाल्याचे दर्शविणारा फलक लावण्यात आला असताना प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपूर्ण असल्याची कबुली महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कार्यकारी अभियंत्यांनी कार्यालयीन पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे या कामाबाबतच्या तक्रारीनंतर मोठी पोलखोल झाली आहे.
तक्रारदारांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर संगनमत करून ₹1 कोटी 62 लाख 42 हजारांचा अपहार केल्याचा आरोप करत चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच काम सुरू करण्याची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आणि काम पूर्ण करण्याची तारीख 21 ऑगस्ट 2025 अशी असतानाही जुलै 2026 मध्ये “काम पूर्ण” असल्याचा फलक लावण्यात आल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
या तक्रारीवर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता आर. आर. सोनवाळ यांनी दिलेल्या लेखी उत्तरात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, संबंधित रस्त्याच्या कामाला 13 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी देण्यात आली होती आणि नियमानुसार 21 ऑगस्ट 2025 पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराकडून काम सुरू करण्यास विलंब झाला आणि काम आजही पूर्ण झालेले नाही.
पत्रानुसार, रस्त्यावरील पाईप पुलाचे काम आणि गिट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी डांबरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हा रस्ता पूर्ण झालेला नसल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या कामावर आतापर्यंत ₹54.58 लाखांचा खर्च झाल्याची नोंद असून, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण ₹1.62 कोटींचा आहे. मात्र रस्ता अपूर्ण असल्याची बाब त्यांनी स्पष्ट मान्य केली आहे.
पावसाळा सुरू असल्यामुळे सध्या डांबरीकरणाचे काम करता येत नसून, पावसाळा संपल्यानंतर उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काम पूर्ण होण्यापूर्वीच “काम पूर्ण” असल्याचा फलक का लावण्यात आला? तो कोणी लावला? आणि कोणाच्या आदेशाने लावण्यात आला? या प्रश्नांमुळे या प्रकरणात नव्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. एक वर्षानंतर बोर्ड लावण्याचे कारण काय याची संपूर्ण चौकशी मागणी नवीन पत्राद्वारे करण्यात आली व माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मागविण्यात आली त्यामुळे प्रकरण कोणते वळण घेतील त्याकडे सगळ्या गावाचे लक्ष लागले आहे



