शहर

हिमायतनगरला कधी मिळणार प्रामाणिक लोकप्रतिनिधी? महामार्गावरील ड्रीम बार जवळील टी-पॉईंटवर ६ एमएमच्या सळया वापरून केलेलं नालीचं काम अवघ्या एका महिन्यातच कोसळलं; नगर पंचायत आणि आमदार-खासदारांचे अक्षम्य दुर्लक्ष!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी, शेख खय्युम): शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावर ड्रीम बार आणि वाईन्स शॉप दरम्यानच्या टी-पॉईंट रस्त्यावरील नालीचे बांधकाम महिनाभरही टिकले नाही. कंत्राटदाराने चक्क ६ एमएमच्या अतिशय बारीक आणि निकृष्ट दर्जाच्या सळया वापरून केलेल्या महाभ्रष्टाचाराचा स्लॅब पत्त्यांसारखा कोसळला असून, संपूर्ण लोखंडी तारा उघड्या पडल्या आहेत. या गंभीर प्रकारामुळे महामार्गावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
​नगर पंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष!
या धक्कादायक प्रकारानंतर स्थानिक नगर पंचायत प्रशासन, विद्यमान आमदार आणि खासदार यांच्यावर जनतेतून तीव्र शेलक्या शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. “निवडणुकीत मोठे-मोठे दावे करणारे आमदार आणि खासदार आता कुठे गेले? नगर पंचायतीचे जबाबदार अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत? हिमायतनगरला कधीतरी प्रामाणिक आणि कार्यक्षम नेते मिळतील का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. महामार्गासारख्या महत्त्वपूर्ण कामात कंत्राटदाराची ही मनमानी थेट नगर पंचायत आणि लोकप्रतिनिधींच्या नाकाखाली सुरू असून, सर्व यंत्रणा याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत.
​माध्यमांची पोलखोल, नागरिकांचा विरोध; तरीही कंत्राटदार निर्ढावलेलाच!
विशेष म्हणजे, या निकृष्ट कामाविरोधात स्थानिक नागरिकांनी प्रचंड आक्रोश केला, वर्तमानपत्रांतून आणि सोशल मीडियावरून सातत्याने या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आली; परंतु तरीही संबंधित कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून कंत्राटदाराला नगर पंचायतीसह बड्या नेत्यांचे थेट अभय असल्याचे स्पष्ट होत आहे. या अक्षम्य दुर्लक्षामुळे हिमायतनगरला कधीतरी प्रामाणिक आणि कर्तबगार लोकप्रतिनिधी मिळतील की नाही, असा सवाल विचारत तात्काळ वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button