हिवरा (संगम) ग्रामपंचायतीतील अंशकालीन स्त्री परिचर भरतीवर आक्षेप; चौकशी करून भरती रद्द करण्याची मागणी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) ग्रामपंचायतीमध्ये अंशकालीन स्त्री परिचर पदाच्या भरती प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हा परिषद, यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या भरतीची सखोल चौकशी करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सदर पदासाठी एकूण पाच अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, गुणवत्ता तसेच शासनाने निर्धारित केलेले निकष विचारात न घेता प्रशासक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने एका उमेदवाराची निवड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अधिक पात्र व अनुभवी उमेदवारांवर अन्याय झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत असताना केवळ दैनंदिन व अत्यावश्यक प्रशासकीय कामकाज करणे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती करणे योग्य नसल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला असून, या भरतीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सदर भरती तत्काळ रद्द करावी तसेच शासनाच्या नियमानुसार गुणवत्ता व अनुभवानुसार नव्याने पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच दोषी अधिकारी व संबंधित व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
ही तक्रार हिवरा (संगम) ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद देविदास कदम व ग्रामपंचायत सदस्य राजू किसनराव धोतकर यांनी जिल्हा परिषद, यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केली आहे.



