Uncategorized

टॉवरवर आढळलेल्या मृतदेहाच्या गूढाचा उलगडा; खूनप्रकरणी एकास अटक, अल्पवयीन साथीदार ताब्यात महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ७२ दिवसांपासून बेपत्ता असलेले संतोष अजबराव जाधव (वय ३५, रा. मधुकरनगर, पुसद) यांचा मृतदेह वरुड एमआयडीसी परिसरातील बंद क्वार्टरच्या इमारतीवरील जिन्याच्या टॉवरवर कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या गूढ प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), यवतमाळ आणि पुसद ग्रामीण पोलिसांनी छडा लावत एका १९ वर्षीय आरोपीला अटक केली असून, गुन्ह्यात एका अल्पवयीन साथीदाराचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी वरुड एमआयडीसी येथील इमारतीच्या टॉवरवर अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेत तपासाला गती दिली. त्यातून मृताची ओळख संतोष अजबराव जाधव अशी पटली.
तपासादरम्यान श्याम अशोक राठोड (वय १९, रा. आंबेडकरनगर, पुसद) याने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने संतोष जाधव यांचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वरुड एमआयडीसी येथील इमारतीच्या जिन्यावरील टॉवरवर नेऊन टाकल्याची माहिती आरोपीने चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध खून, पुरावा नष्ट करणे तसेच इतर संबंधित कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला पुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवयीन साथीदाराबाबतही कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमित मेहते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पुसद ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button