महागाव (जुने) छत्रपती संभाजी राजे चौकातील SIR शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी

जनतेच्या सेवेसाठी नगरसेविका जयश्रीताई संजय नरवाडे यांचा पुढाकार; मतदार नोंदणी व दुरुस्ती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
भारत निर्वाचन आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार विशेष गहन पुनर्निरीक्षण (SIR-2026) अभियानांतर्गत महागाव (जुने) येथील छत्रपती संभाजी राजे चौकात मंगळवार, दि. 14 जुलै 2026 रोजी मतदार सत्यापन व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली मतदार माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती व SIR फॉर्म भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
या शिबिराचे आयोजन नगरसेविका जयश्रीताई संजय नरवाडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. शिबिरादरम्यान नागरिकांना 2002 च्या मतदार यादीतील नावे मोबाईलद्वारे शोधून त्यांचे तपशील उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांना आवश्यक पुरावे मिळण्यास मदत झाली आणि त्यांचा वेळ वाचल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
शिबिराला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा लोकाभिमुख शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा भारत निर्वाचन आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिबिरात नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील नाव, पत्ता, जन्मतारीख व इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती, तसेच स्थलांतरित मतदारांच्या नावांबाबत आवश्यक SIR अर्ज स्वीकारण्यात आले. पंचायत समितीचे अधिकारी, बीएलओ (BLO), नगरपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नागरिकांना अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले.
यावेळी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदार यादीतील माहिती अचूक असणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
शिबिराचे नियोजन, व्यवस्थापन आणि नागरिकांना देण्यात आलेल्या तत्पर सहकार्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. जनतेच्या सेवेसाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल महागावकरांनी नगरसेविका जयश्रीताई संजय नरवाडे यांच्या कार्याचे कौतुक केले.



