समाधानकारक पाऊस नसल्याने हळद, कापूस व सोयाबीन संकटात; कासारबेहळ–सेवानगर परिसरातील शेतकरी चिंतेत

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील कासारबेहळ, सेवानगर व परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत मोठ्या आशेने केलेली हळदीची लागवड उष्णतेमुळे धोक्यात आली असून कापूस, सोयाबीन व इतर खरीप पिकांची कोवळी रोपे करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशेचे वातावरण आहे.
यंदा मान्सूनने सुरुवातीला हजेरी लावली असली तरी त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी हळदीची लागवड अनेक ठिकाणी जमिनीतच नासण्याची भीती निर्माण झाली असून कापूस व सोयाबीनच्या कोवळ्या पिकांवर उष्णतेचा मोठा परिणाम होत आहे.
विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस घटत असल्याने पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी कठीण बनले आहे. हळद, कापूस आणि सोयाबीन ही खर्चिक पिके असल्याने बियाणे, खत, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च करूनही अपेक्षित पाऊस न झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास कापूस, सोयाबीन, हळद तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत, आर्थिक दिलासा व पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या कासारबेहळ, सेवानगर व परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, वेळेत पाऊस झाला तरच खरीप हंगाम सावरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.



