ढाणकी परिसरात तलवार-खंजीर बाळगणाऱ्या युवकावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

उमरखेड
यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी ढाणकी परिसरात धडक कारवाई करत एका युवकाकडून तलवार व खंजीर जप्त केला आहे. या प्रकरणी युवकाविरुद्ध आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गस्त घालत असताना पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीतील ढाणकी–सावळेश्वर रोडवरील आदर्श नगर ले-आऊट परिसरात एक युवक धारदार शस्त्रे बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित युवकाला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडील प्लास्टिक पिशवीतून स्टीलची तलवार व स्टीलचा खंजीर असा सुमारे 4 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी शस्त्रे जप्त करून युवकाला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव अनुज निळकंठ लोखंडे (वय 19), रा. पिरंजी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ असे आहे. त्याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम 4 व 25 अन्वये पोलीस स्टेशन बिटरगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रे, अवैध धंदे आणि गंभीर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.



