वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात दगडथर-घानमुख ग्रामस्थ आक्रमक; २९ जूनपर्यंत उपाययोजना न झाल्यास ‘वाचवा! वाचवा! वाचवा!’ आंदोलनाचा इशारा

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : मौजे दगडथर-घानमुख परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर व त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार महागाव, वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव तसेच ठाणेदार महागाव यांना निवेदन देण्यात आले.
कॉम्रेड डी. बी. नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास मोहकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पीडित झालेल्या नागरिकांना शासनाच्या मदत निधीचा लाभ तात्काळ मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदन देताना गावातील नागरिक, शेतकरी व पीडित कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने २९ जून २०२६ पर्यंत सदर शिवारातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून त्यांचे अन्यत्र स्थलांतर अथवा योग्य व्यवस्थापन करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी कॉम्रेड डी. बी. नाईक, देविदास मोहकर यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास “वाचवा! वाचवा! वाचवा!” आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



