वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! एलसीबीच्या कारवाईत देशी बनावटीची दुहेरी नळी बंदूक जप्त; निलगाय शिकारीचा गुन्हा उघड

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दि. २२ जून : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळने वन्यजीव शिकारीविरोधात मोठी कारवाई करत देशी बनावटीची दुहेरी नळी बंदूक बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ५० हजार रुपये किंमतीची बंदूक जप्त करण्यात आली असून, मार्च महिन्यात पांढुर्णा-इंजनी शेतशिवारात घडलेल्या निलगाय शिकारीच्या गुन्ह्याचाही उलगडा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने काळी (दो) परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीची दुहेरी नळी बंदूक जप्त करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने आपल्या एका साथीदारासह मार्च महिन्यात पोखरी-इंजनी शेतशिवारात निलगायची शिकार केल्याची कबुली दिली. त्यानंतर वन विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला असून, शिकारीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन्यजीवांची अवैध शिकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे वन्यजीव शिकारीविरोधातील मोहिमेला बळ मिळाले असून, परिसरातील वन्यजीव संरक्षणासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
चौकट
जिल्ह्यात वन्यजीव शिकारीविरोधात मोहीम तीव्र
वन्यजीवांची अवैध शिकार रोखण्यासाठी पोलिस व वन विभागाने संयुक्तपणे कारवाया वाढवल्या आहेत. निलगायसह इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी संशयितांवर लक्ष ठेवले जात असून, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



