Uncategorizedशहर

उमरखेड शहरासह ढाणकी व पोफाळी अवैध धद्यांच्या विळख्यात ?कारवाई की केवळ दिखावा !

गुटखा, अवैध दारू, रेती तस्करी, जुगार, हप्तेखोरीच्या चर्चानी खळबळ

धाडींचा गाजावाजा, पण धंदे मात्र राजरोस ! ‘लहान माशांवर कारवाई, मोठे मासे अभयारण्यात?’ असा संतप्त सवाल

उमरखेड : तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिक
मजबूत होत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. गुटखा विक्री, अवैध दारूची तस्करी, रेतीचा काळाबाजार, जुगार अड्डे आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर अधूनमधून धाडसत्रे राबविली जात असली, तरी काही दिवसांतच तेच धंदे पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ‘कारवाई नेमकी गुन्हेगारांवर होते की फक्त प्रसिद्धीसाठी?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत अवैध धंद्यांचे जाळे पसरल्याची चर्चा आहे.संबंधित यंत्रणांकडून जप्ती, गुन्हे आणि घाडसत्रांची माहिती जाहीर केली जाते; मात्र त्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कारवायांची परिणामकारकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

धाड’ पडते… पण धंदा बंद का होत नाही?

प्रशासनाकडून वेळोवेळी धाडसत्रे राबविली जातात. लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होतात. मात्र काही दिवसांतच त्याच भागात तोच व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची चर्चा रंगते. त्यामुळे धाडींचा उद्देश कायमस्वरूपी बंदोबस्त आहे की केवळ आकडेवारी वाढविणे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

युवकांना लागतोय व्यसनाचा विळखा

गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर व्यसनाधीन करणाऱ्या वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी धोकादायक व्यसनांच्या गर्तेत ओढली जात असल्याची चिंता पालक व्यक्त करीत आहेत. अनेक भागांत अल्पवयीनांपर्यंतही अशा पदार्थाची सहज विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, याकडे कठोरपणे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रेती माफिया, अवैध दारूचे जाळे कायम ?

तालुक्यातील नदीपात्रांमधून नियमबाह्य रेती उत्खनन सुरू असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर आणि इतर वाहनांद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याची चर्चा असून, महसूल आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचप्रमाणे काही भागांत अवैध दारूची विक्री आणि वाहतूकही सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हप्तेखोरीच्या चर्चांनी वाढवली खळबळ

अवैध धंद्यांइतकीच हप्तेखोरीची चर्चा सध्या जिल्हाभर रंगली आहे. काही प्रभावशाली व्यक्तींचे निकटवर्तीय विविध अवैध व्यवसायांकडून नियमित आर्थिक वसुली करतात, असे आरोप चर्चेतून पुढे येत आहेत. ‘चंदे सुरू राहतात म्हणजे कुणाचे तरी संरक्षण असणारच,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दिखावा नको, निर्णायक कारवाई हवी

अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळे उध्वस्त करण्यासाठी केवळ धाडसत्रे पुरेशी नसून, आर्थिक साखळी, संरक्षण देणारे घटक आणि मूळ सूत्रधार यांच्यापर्यंत तपास पोहोचणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक करीत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण झाला तरच अवैध धंद्यांना आळा बसेल, अन्यथा “धाडी सुरूच राहतील आणि धंदेही तेजीत राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कारवाई ‘प्याद्यांवर’; सूत्रधार मात्र मोकाट ?

अनेक नागरिकांच्या मते, कारवाई प्रामुख्याने किरकोळ विक्रेते किंवा वाहतूक करणाऱ्यांपुरती मर्यादित राहते. मात्र संपूर्ण साखळी नियंत्रित करणाऱ्या मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास मात्र पोहोचत नसल्याची भावना वाढत आहे. त्यामुळे ‘मोठे मासे कोणाच्या संरक्षणाखाली राज्य अभयारण्यात वावरत आहेत का?” हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

राजकीय छत्रछायेचाही संशय

अनेक नागरिकांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू राहण्यासाठी काही प्रभावशाली घटकांचे पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही राजकीय व्यक्तींच्या भूमिकेबाबतही चर्चा होत असली, तरी त्यासंदर्भात कोणताही अधिकृत पुरावा किंवा पुष्टी समोर आलेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चावर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button