उमरखेड पोलिसांचा धडाका कायम! तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा सराईत आरोपी जेरबंद

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उमरखेड पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक यश मिळाले असून, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या एका सराईत आरोपीला उमरखेड डी.बी. पथकाने शिताफीने अटक केली आहे. आरोपीविरुद्ध Maharashtra Police Act, 1951 च्या कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १८ जून रोजी रात्री उशिरा डी.बी. पथक नियमित गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे शेख तेहमीर उर्फ तम्या शेख समीर (वय २२, रा. आंबेडकर वॉर्ड, उमरखेड) हा तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरत असल्याचे निष्पन्न झाले. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी करोडी रोड कॅनॉल परिसरात सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीवर उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांनी कलम ५६(१)(अ) अन्वये यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार आदेश लागू केल्याचे समोर आले. मात्र संबंधित आदेशाचे उल्लंघन करून तो उमरखेड शहरात वास्तव्यास असल्याचे आढळून आल्याने पंचनामा करून त्याच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५४३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप ठाकूर करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
कायद्याला आव्हान देणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत उमरखेड पोलिसांनी गुन्हेगारांवरील धडक मोहीम आणखी तीव्र केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.



