शहर

वादग्रस्त पेट्रोल पंपावर कारवाईची मागणी तीव्र; इंधन पुरवठा तात्काळ बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

मुख्य संपादक मो.नं.9021233696

उमरखेड, दि. २९ जून :
उमरखेड शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या वादग्रस्त पेट्रोल पंपावर तात्काळ कारवाई करून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा बंद करण्यात यावा, तसेच सदर पंपावरून होत असलेली पेट्रोल डिझेल विक्री थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उमरखेड येथील शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित पेट्रोल पंपामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परिसरात अडथळे निर्माण होत असून, या प्रकरणी यापूर्वी अनेक तक्रारी व निवेदने देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूमी अभिलेख विभागाने केलेल्या मोजणीत अतिक्रमण स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित कंपनीने या मोजणीविरोधात कोणतेही अपील किंवा पुनर्मोजणीची मागणी केली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी झालेली अधिकृत मोजणी अस्तित्वात असताना पुन्हा मोजणी करण्याचा प्रयत्न हा कारवाई लांबविण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता संबंधित पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठा तात्काळ बंद करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोजताई देशमुख यांनी दिनांक २५ जुन २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा ५ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनाने मौन बाळगल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाला इशारा देत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा आणि विक्री तात्काळ बंद न केल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल. त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन देतेवेळी साहेबराव कांबळे, चितांगराव कदम, प्रवीण मिराशे, ॲड. संजीवकुमार जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास कदम (के के), बसवेश्वर क्षीरसागर यांचे शहर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button