शहर

विधानपरिषद निवडणुकीचा थरार: लोकप्रतिनिधी फुटण्याच्या भीतीने हिमायतनगरच्या नगरसेवकांना पक्षांनी केले ‘अंडरग्राउंड’; तालुक्यात राजकीय खळबळ!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): नांदेड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नगरसेवक फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने, राजकीय पक्षांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आपले नगरसेवक विरोधकांच्या गळाला लागू नयेत म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना मतदानापूर्वीच अचानक अज्ञात स्थळी (सहल) रवाना केले आहे.
​सध्या या सर्व नगरसेवकांचे मोबाईल फोन ‘नॉट रीचेबल’ दाखवत असून, त्यांना थेट ‘अंडरग्राउंड’ करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजप आणि महाविकास आघाडी (MVA) या दोन्ही बलाढ्य गटांच्या नेत्यांनी विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली असून, नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले होते. हाच धोका ओळखून पक्षांनी तात्काळ ही फिल्डिंग लावली आहे.
​दुसरीकडे, जनतेने ज्यांना विकासकामांसाठी निवडून दिले, ते लोकप्रतिनिधी अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर ‘सहल’ करत असल्याने हिमायतनगर तालुका आणि नगरपंचायत परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​सध्या सोशल मीडिया आणि विशेषतः WhatsApp वर या प्रकाराची खूप जोरोंमध्ये चर्चा सुरू आहे. याचबरोबर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब हे सध्या भाजपमध्ये असले, तरीही नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस अजूनही तेच चालवत आहेत, असा जोरदार बोलबाला जनतेत, विविध ग्रुप्सवर आणि सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर, “आमच्याकडून काँग्रेसच्या नावावर मतं मागून ती भाजपला देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत असून, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर यावरून जोरदार खल सुरू आहे. नेटीझन्सनी यावर तीव्र टीका आणि टोलेबाजी सुरू केली असून, या नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण हिमायतनगर तालुक्याचे राजकारण कमालीचे तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button