शहर

थार गाडीच्या वादातून महागावात तीन तास तणाव; हाणामारी, रस्ता जाम, तरीही गुन्हा दाखल नाही

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी थार वाहनाच्या मालकी हक्क आणि व्यवहाराच्या वादातून महागाव शहरात मोठा गोंधळ निर्माण झाला. एका वाहनाचे कथितरीत्या अनेक मालक समोर आल्याने वाद चिघळला आणि दोन गटांमध्ये भर बाजारपेठेत हाणामारी झाली. या घटनेमुळे सुमारे तीन तास वाहतूक ठप्प राहून मुख्य रस्ता जाम झाला होता.

घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित थार वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जप्त केले. मात्र घटनेनंतरही मुख्य संबंधित पक्षांपैकी काही जण पोलीस ठाण्यात दाखल झाले नसल्याची माहिती मिळत आहे. वाहनाच्या मूळ मालकाला संपर्क साधून चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, वाद इतका विकोपाला गेला होता की हाणामारीदरम्यान कोणाचाही जीव जाऊ शकला असता. भर बाजारपेठेत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याचे समोर येत आहे.

तसेच हाणामारीत सहभागी झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी (मेडिकल) झाल्याची माहितीही उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकी काय कारवाई होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सदर थार वाहनाचा खरा कायदेशीर मालक कोण, वाहनाचे व्यवहार नेमके कोणकोणामध्ये झाले, तसेच वाहन महागावपर्यंत कशा परिस्थितीत पोहोचले याचा तपास पोलीस करीत आहेत. सध्या वाहन महागाव पोलीस ठाण्यात जप्त अवस्थेत असून पुढील चौकशी आणि संबंधितांच्या जबाबांनंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भर बाजारात झालेल्या या प्रकारानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आठवडी बाजाराच्या दिवशी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणात तक्रार दाखल होते का, गुन्हा नोंदवला जातो का आणि पोलिसांच्या चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button