उमरखेडमध्ये अवैध पिवळी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य संपादक :
उमरखेड : जिल्ह्यातील अवैध उत्खनन व गौण खनिजांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध पिवळी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 4 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणे, अवैध उत्खनन तसेच विविध गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी Kumar Chinta यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार 11 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड-विडूळ मार्गावरून ट्रॅक्टरद्वारे विना रॉयल्टी पिवळी रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर चुरमुरा फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी एक ट्रॅक्टर अवैधरित्या पिवळी रेती वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी ट्रॅक्टरसह रेती असा एकूण 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बबलू मारोती देवकर (रा. भगतसिंग वॉर्ड, उमरखेड) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(8) व 47(7) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई Kumar Chinta, Ashok Thorat तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक Satish Chavare यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज बांडे, पोउपनि अमोल राठोड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवैध रेती माफियांना इशारा
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यातील गौण खनिज माफियांविरोधातील कारवाया आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाने अवैध उत्खनन व वाहतुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.



