जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनात डॉ. संदीप गायकवाड यांचा आदर्श; इतर डॉक्टरांनीही घ्यावा बोध

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरात सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्या वैद्यकीय व औषधी कचऱ्यामुळे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना, लाइफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप गायकवाड यांनी जैववैद्यकीय कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी केलेली व्यवस्था इतर वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आदर्श ठरत आहे.
माहितीनुसार, डॉ. संदीप गायकवाड यांच्या लाइफ केअर हॉस्पिटलमधील सर्व जैववैद्यकीय कचरा अधिकृत संस्थेमार्फत नियमितपणे उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक बी-३४ येथे कार्यरत जैववैद्यकीय कचरा उचल, वाहतूक व विल्हेवाट प्रकल्पाशी करार करण्यात आला आहे. संबंधित संस्थेला निर्धारित शुल्क भरून विशेष वाहनाची सुविधा उपलब्ध करून घेण्यात आली असून, दवाखाना सुरू झाल्यापासून आजपर्यंत सर्व वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट त्याच अधिकृत प्रक्रियेद्वारे करण्यात येत आहे.
वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याने संसर्गजन्य रोगांचा प्रसार, पर्यावरण प्रदूषण तसेच नागरिक व जनावरांच्या आरोग्याला होणारा धोका टाळण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील सर्व दवाखाने, क्लिनिक व रुग्णालयांनी अशाच प्रकारची व्यवस्था उभारून जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
महागाव शहरातील काही ठिकाणी औषधी व वैद्यकीय कचरा उघड्यावर आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. संदीप गायकवाड यांनी राबविलेली व्यवस्था एक आदर्श उदाहरण ठरू शकते. नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारचा खेळ होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीची जाणीव ठेवून अधिकृत यंत्रणांमार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जनतेच्या आरोग्य व पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्वांनी जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. :::



