शहर

महागाव शहरात मुदतबाह्य औषधांचा कचरा; पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याला धोका


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मुदतबाह्य औषधे व मेडिकलमधील कचरा टाकण्यात आल्याने पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तहसील कार्यालयाजवळ, एमएसईबीच्या डीपी परिसरात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील खुल्या मैदानात औषधी कचऱ्याचे ढिगारे पडलेले असल्याचे दिसून येत आहे.
शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून त्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असताना नाल्यांची सफाई व कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. महागाव नगरपंचायत हद्दीतील एक ते १७ प्रभागांमध्ये कचरा व साचलेल्या घाणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायतीकडून काही वेळा स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असल्या तरी त्या केवळ औपचारिकतेपुरत्याच मर्यादित राहतात. नव्याने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर एक दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती; मात्र त्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढिगारे दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेला मुदतबाह्य औषधांचा कचरा नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो. हा कचरा जनावरांच्या पोटात गेल्यास त्यांची हानी होण्याची शक्यता असून दूषित पदार्थांमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. तसेच पावसाच्या पाण्यासोबत हा कचरा नाल्यांमध्ये व जलस्रोतांमध्ये गेल्यास पर्यावरणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर महागाव नगरपंचायतीने तातडीने संबंधित ठिकाणांची पाहणी करून औषधी व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, शहरातील नाल्यांची साफसफाई करावी आणि नियमित स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी महागावकर नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button