दुष्यंत चतुर्वेदींचा बिनविरोध विजय; विरोधकांचा पूर्ण गेम ओव्हर!

उमरखेड:- यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर तोच झाला ज्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेनेचे विद्यमान आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेत बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना जबरदस्त राजकीय धक्का दिला आहे.
एकूण पाच उमेदवार रिंगणात असताना निवडणूक रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र राजकीय घडामोडींनी असा वेग घेतला की अखेर विरोधकांचे संपूर्ण गणितच कोलमडून पडले.
काँग्रेसचा उमेदवार अचानक माघारी; राजकीय वर्तुळात खळबळ
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी 3 जून रोजी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या एका निर्णयाने संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
भाजपचीही माघार; विरोधकांचा किल्ला ढासळला
काँग्रेसनंतर भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांनीही पक्षाच्या निर्देशानुसार अर्ज मागे घेतला. त्यानंतर उरलेल्या दोन अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतल्याने निवडणुकीतील सर्व अडथळे दूर झाले आणि दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
‘एकटा दादा, सगळ्यांवर भारी!’
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत संपर्क, संघटनात्मक ताकद आणि गेल्या कार्यकाळातील राजकीय पकड यामुळे चतुर्वेदी यांची बाजू सुरुवातीपासूनच मजबूत होती. विरोधकांकडे उमेदवार होते, पण विजयाचे समीकरण नव्हते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
महाविकास आघाडीसमोर अनेक प्रश्न
साहेबराव कांबळे यांच्या अचानक माघारीमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवाराने पक्षाशी चर्चा न करता घेतलेला निर्णय हा केवळ वैयक्तिक होता की त्यामागे अन्य राजकीय समीकरणे होती, यावर आता तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
दुसऱ्यांदा विधान परिषदेत दमदार एन्ट्री
बिनविरोध निवड झाल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून जिल्हाभरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेत पोहोचणारे चतुर्वेदी आता जिल्ह्याच्या राजकारणातील अधिक प्रभावशाली चेहरा म्हणून पुढे आले आहेत.
राजकीय वर्तुळातील चर्चेतील ओळ
“लढाई सुरू होण्याआधीच विरोधकांनी शस्त्रे टाकली आणि दुष्यंत चतुर्वेदींवर दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला गेला!”



