विधान परिषदेत मोठा राजकीय ट्विस्ट! साहेबराव कांबळेंची अचानक माघार; महाविकास आघाडी मैदानाबाहेर, आता भुतडांवर सर्वांच्या नजरा

मुख्य संपादक
विधान परिषद निवडणुकीत रंगत आलेल्या राजकीय समीकरणांना बुधवारी अचानक मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अनपेक्षितपणे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र एका क्षणात बदलले आहे. तिहेरी लढतीची चर्चा रंगत असतानाच काँग्रेसच्या माघारीमुळे महाविकास आघाडी थेट स्पर्धेतून बाहेर पडली असून आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याकडे लागले आहे.
काँग्रेसने साहेबराव कांबळे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवले होते. दुसरीकडे महायुतीच्या वतीने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत. तर भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यामुळे निवडणूक तिरंगी होणार, अशी चर्चा जोर धरत असतानाच काँग्रेसनेच माघार घेतल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
विशेष म्हणजे, नितीन भुतडा यांच्या माघारीच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच उलट काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनीच माघार घेतल्याने राजकीय निरीक्षकही चक्रावले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत खऱ्या अर्थाने सामना होणार की महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा मार्ग अधिक सुकर होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
दरम्यान, मुंबईत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळे नितीन भुतडा यांच्यावरील राजकीय दबाव आणखी वाढल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर दिवसभर भुतडा हे संपर्काबाहेर असल्याने पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे.
काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर
साहेबराव कांबळे यांच्या माघारीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. “माघारीचा निर्णय घेताना पक्षाशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. आता पक्षाचे पदाधिकारी एकत्र बसून पुढील भूमिका निश्चित करतील. ही लोकशाही वाचविण्याची लढाई आहे आणि ती आम्ही लढणारच,” असे नाईक यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात एकच चर्चा…
काँग्रेसची अनपेक्षित माघार, भुतडांची रहस्यमय शांतता आणि महायुतीचे आदेश यामुळे विधान परिषद निवडणुकीचे राजकारण आता अधिकच गूढ बनले आहे. पुढील काही तासांत कोणता नवा राजकीय बॉम्ब फुटतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



