शहर

विधान परिषद निवडणुकीत महायुतीत विसंवाद उघड; साहेबराव कांबळे, दुष्यंत चतुर्वेदी व नितीन भुतडा यांच्यासह पाच जणांचे नामांकन

सहसंपादक शेख मुजाहिद मो 7798306192

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपले नामांकन अर्ज दाखल केले. मात्र, राज्यस्तरावर जागावाटप होऊनही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने महायुतीतील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

राज्यस्तरीय चर्चेनंतर यवतमाळ विधान परिषदेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे मानले जात असतानाच, शिवसेनेचे माजी आमदार दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले. पालकमंत्री संजय राठोड यांनी मध्यस्थीची भूमिका घेत या उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मात्र, अवघ्या काही मिनिटांत भाजपनेही आपली स्वतंत्र भूमिका स्पष्ट करत नितीन सुरेशचंद्र भुतडा यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शनात दाखल केला. त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीतील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता भाजप अथवा शिवसेना यापैकी कोण माघार घेणार, की निवडणूक मैत्रीपूर्ण लढतीत रूपांतरित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव दत्तराज कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीचे रणांगण अधिकच तापविले. त्यांच्या नामांकनावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी उपस्थिती दर्शविली.

एकूण पाच उमेदवार मैदानात

विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत खालील उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत :

  1. साहेबराव दत्तराज कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
  2. दुष्यंत सतीश चतुर्वेदी (शिवसेना)
  3. नितीन सुरेशचंद्र भुतडा (भारतीय जनता पक्ष)
  4. सय्यद फारूक सय्यद करीम (अपक्ष)
  5. अन्य एक अपक्ष उमेदवार

भाजपचे शक्तिप्रदर्शन

भाजप उमेदवार नितीन भुतडा यांच्या नामांकनावेळी आमदार किसन वानखेडे, माजी आमदार ॲड. निलय नाईक, राजू पडगीलवार, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनातून भाजपने निवडणूक लढविण्याचा निर्धार स्पष्ट केल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीची एकजूट

महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या नामांकनावेळी ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीनेही एकजुटीचे प्रदर्शन करत निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली.

चर्चांना पूर्णविराम, आता लक्ष माघारीकडे

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असला तरी महायुतीतील दोन उमेदवारांमुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत कोणते नवे राजकीय समीकरण आकार घेते आणि निवडणुकीचे अंतिम चित्र काय राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button