गरिबांच्या वॉर्डात पाण्याचा दुष्काळ, व्ही.आय.पी. एरियात पाण्याचा सुकाळ; हिमायतनगर नगरपंचायतीच्या दुजाभावामुळे ईदच्या दिवशीही जनता हवालदिल! ||

हिमायतनगर तालुका ( प्रतिनिधी शेख खय्यूम):
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि मूलभूत सुविधा मिळवण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या अत्यंत ढिम्म आणि पक्षपाती कारभारामुळे आज या अधिकारांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. आज संपूर्ण शहरात ईदचा पवित्र सण साजरा होत असताना, नगरपंचायतीच्या अक्षम्य नियोजनामुळे वॉर्ड क्रमांक १३ मधील सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
गरीब कुठे जाणार, न्याय कुठे मिळणार? शहरात तीव्र संताप!
वॉर्ड क्रमांक १३ मधील पाणीपुरवठा एकाच विहिरीवर अवलंबून असून तिथून सध्या केवळ थेंब-थेंब पाणी पडत आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये फिरून पाहणी करण्याचे कर्तव्य विसरून केवळ कार्यालयातच बसून राहतात. त्यातच अबालवृद्धांमध्ये एक अत्यंत संतापजनक चर्चा रंगली आहे; नगरपंचायत प्रशासन सर्वसामान्य आणि गरीब वॉर्डाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, केवळ ज्या भागात व्ही.आय.पी. (VIP) लोक राहतात, त्याच व्ही.आय.पी. एरियामध्ये पाणीपुरवठ्याचे कनेक्शन आणि सुविधा सुरळीत देत आहे.
या पक्षपातीपणामुळे “आम्ही गरिबांनी कुठे जायचे? कोणाकडे दाद मागणार आणि आम्हाला न्याय कुठे मिळणार?” असा आर्त आणि संतप्त सवाल आता शहरातील गरीब व करदाती सर्वसामान्य जनता विचारत आहे. केवळ ठराविक व्ही.आय.पी. भागाला झुकते माप देऊन त्याचे सोशल मीडियावर फोटो टाकून विकास दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरपंचायत करत असल्याचा आरोप होत आहे.
संविधानाच्या चौकटीत प्रशासनाने जबाबदारी ओळखावी!
लोकशाहीत आणि संविधानाच्या चौकटीत प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे नगरपंचायतीने ही पोकळ प्रसिद्धी आणि पक्षपाती कारभार तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. संपूर्ण शहरात आणि विशेषतः वॉर्ड १३ मध्ये तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करून प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडावे, हीच या भागातील त्रस्त जनतेची प्रमुख मागणी आहे.



