उन्हाच्या तडाख्यात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटली नाही

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील युनियन बँकेच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर एका दुकानामागे आज दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार असले, तरी नागरिकांकडून उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आली असून कानातून रक्तस्राव झालेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंभोरे एपीआय घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र बराच वेळ महागाव पोलीस ठाण्यातील बीट जमादार व पोलीस शिपाई घटनास्थळी न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
मृत व्यक्तीची ओळख पंचनामा होईपर्यंत पटलेली नव्हती. तसेच मृतदेह सुमारे दोन ते तीन तास बेवारस अवस्थेत पडून असल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
ही बातमी लिहीपर्यंत पंचनामा प्रक्रिया सुरू झालेली नव्हती.



