शहर

उमरखेड नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार?

भाजपच्या नऊ नगरसेवकांचा प्रशासनाविरोधात व सत्ताधारीचे विरोधात एल्गार; “जनतेची कामे ठप्प, फक्त आश्वासनांचा पाऊस”

मुख्य संपादक शेख इरफान

उमरखेड नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रिय आणि पक्षपाती कारभाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला असून नगरपरिषद प्रशासनावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील गंभीर समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
विशेष म्हणजे, निवेदन देताना भाजपचे तब्बल नऊ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
भाजप गटनेते व नगरसेवकांनी आरोप केला की, “शहरातील नागरिक मूलभूत सुविधांसाठी त्रस्त आहेत; मात्र सत्ताधारी मंडळी फक्त राजकारण आणि दिखाऊ बैठकीत व्यस्त आहेत.” अनेक प्रभागांमध्ये पाणीटंचाई, घाणीचे साम्राज्य, बंद पथदिवे, नाल्यांची साफसफाई रखडलेली असताना नगरपरिषद प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा संताप निवेदनातून व्यक्त करण्यात आला.
निवेदनात सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण, ओपन स्पेसवरील बेकायदेशीर बांधकामे, अतिरिक्त कर वसुली, रखडलेली विकासकामे, तसेच नागरिकांच्या वारंवार तक्रारींकडे होत असलेले दुर्लक्ष यावर जोरदार बोट ठेवण्यात आले आहे. “सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच अनेक बेकायदेशीर कामांना संरक्षण मिळत आहे का?” असा सवालही भाजप नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, नगरपरिषदेत मंजूर झालेल्या अनेक कामांच्या निविदा निघाल्या; मात्र प्रत्यक्षात कामे सुरूच झाली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. “कागदावर विकास आणि प्रत्यक्षात शून्य काम” अशी टीका करत भाजप नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

“जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. नगरपरिषद कार्यालयावर बहिष्कार ही फक्त सुरुवात आहे,” असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमरखेड नगरपरिषदेत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून भाजपने सत्ताधाऱ्यांविरोधात थेट मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. सदर निवेदनावर भाजपाचा नगरसेवक/नगरसेविका सौ. करुणाताई पुंडलिकराव कुबडे, गोपाल मधुकर कलाने, इंजि.सुरेंद्र कोडगिरवार, सौ ज्योत्स्ना प्रतिक रूडे, सौ खुशबू पवन मेंढे, अमोल दत्तात्रय तिवरंगकर, भास्कर ज्ञानेश्वर साधू, सौ वंदना सचिन घाडगे, विजय गुजरे यांच्या स्वाक्षऱ्या असून शहरातील वाढत्या समस्यांमुळे प्रशासनाविरोधात जनतेतही तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button