कोट्यवधींचा बजेट गेला कुठे? नळ कनेक्शनच्या नावाखाली हिमायतनगरकरांची उघड लूट; ‘टक्केवारी’च्या कारभारावर जनतेचा तीव्र संताप!

हिमायतनगर तालुका ( प्रतिनिधी शेख खय्यूम)
: हिमायतनगर शहराची तहान भागवण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा पाणीपुरवठा बजेट मंजूर करण्यात आला होता. मात्र, एवढा अवाढव्य निधी मंजूर झालेला असतानाही प्रत्यक्ष कामात मोठी टक्केवारी आणि कमिशनखोरी सुरू असल्याची खळबळजनक चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे. नळ कनेक्शनच्या नावाखाली सामान्य जनतेकडून चक्क ३,९०० रुपये उकळले जात असल्याने प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
वास्तविक पाहता, नळ जोडणीसाठी लागणारा पाईप, आवश्यक साहित्य आणि मजुरी असा संपूर्ण खर्च खाजगीत अवघ्या १,९०० रुपयांमध्ये पूर्ण होत आहे. कंत्राटदार आणि टक्केवारीचे लोक एवढ्या पैशात संपूर्ण काम करून देत असताना, नगरपंचायत प्रशासन अधिकृत कोटेशनच्या नावाखाली नागरिकांकडून वरचे २,००0 रुपये नेमके कशासाठी जमा करून घेत आहे? असा रोखठोक सवाल आता हिमायतनगरकर विचारत आहेत.
जर योजनेचा बजेट कोट्यवधींचा होता, तर नगरपंचायतीने या २,००० रुपयांच्या कोटेशनमध्ये स्वतः पाईप आणि साहित्य देऊन हे काम मोफत किंवा अत्यंत अल्प दरात करून देणे बंधनकारक होते. परंतु, इथे अधिकारी आणि कंत्राटदारांची मोठी टक्केवारी ठरलेली असल्यामुळेच सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. एकूण ३,९०० रुपयांच्या या वसुलीत सामान्य नागरिकांची होणारी उघड लूट थांबवून, पाणीपुरवठा योजनेच्या या कोट्यवधींच्या बजेटची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आता शहरात जोर धरू लागली आहे.



