महागाव नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिक त्रस्त — शैलेश कोपरकर प्रशासनावर गंभीर आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना महागाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गेल्या जवळपास एक महिन्यापासून मोटार पंप बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमिटी महागावचे अध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी नगरपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत ही समस्या जाणून-बुजून व हेतुपुरस्सर दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप केला आहे.
प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागांमध्ये नळांना पाणी येत नसल्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना हातात भांडी घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत आहे. काही नागरिकांना खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भारही वाढला आहे. नगरपंचायतीने वेळेत दखल घेतली असती तर नागरिकांवर अशी वेळ आली नसती, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
नगरसेवक शैलेश कोपरकर यांनी सांगितले की, “प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील मोटार पंप गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र संबंधित अधिकारी व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय द्वेषातून ही कामे रखडविण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. मात्र नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ कागदी घोडे नाचवत आहे. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना पाण्याअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिलांचे हाल होत आहेत, लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे, तर काही भागांमध्ये स्वच्छतेचे प्रश्नदेखील निर्माण झाले आहेत.”
सध्या वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज अधिक असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र अधिकारी वर्गाने वेळकाढूपणा करत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही शैलेश कोपरकर यांनी केला आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रभागातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायत कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र अद्यापही मोटार पंप दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. परिणामी संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मोटार पंप सुरू करावा व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“जर प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील,” असा इशारा नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमिटी महागावचे अध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी दिला आहे.



