“शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, पिक विमा द्या; पात्र महिलांना लाभ द्या !”

महिला-शेतकऱ्यांचा तहसीलवर हाहाकार मोर्चा
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तहसील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात महिला व शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. “शेतकऱ्यांना पिक विमा मिळालाच पाहिजे, पात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळालाच पाहिजे” या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला. जनआंदोलन समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हाहाकार मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला.
वर्षानुवर्षे पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. वडद परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश होऊनही महसूल विभाग मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. मंत्री बावनकुळे यांच्या आदेशालाही प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
“शेतकरी मरत असताना अधिकारी फक्त कागदांवर बैठका घेत आहेत. पिक विम्याच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे,” असा संतप्त सूर आंदोलकांनी व्यक्त केला. अनेक पात्र महिलांना “लाडकी बहीण” योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व कृषी अवजारांसाठी पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
मोर्चात महिला, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजीने तहसील परिसर हादरला असून प्रशासनाविरोधातील रोष उघडपणे समोर आला.



