आरोग्यशहर

ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन; सेवा, भारत, मदीना आणि तिरुपतीसह

हिमायतनगरमधील सर्व मेडिकल कडकडीत बंद!
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ आणि अवाजवी सवलतींमुळे (Deep Discounts) स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) च्या वतीने राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला हिमायतनगर शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून, सर्वच औषध दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत.
​यात प्रामुख्याने उमर चौक येथील सेवा मेडिकल, तसेच चौपाटी व सरकारी दवाखान्या जवळील भारत मेडिकल, मदीना मेडिकल आणि तिरुपती मेडिकल या प्रमुख दुकानांमधे आज कडकडीत बंद पाहायला मिळाला असून, सर्व लहान-मोठ्या मेडिकलचे शटर्स पूर्णपणे डाऊन आहेत. ऑनलाईन आणि ई-फार्मसी प्लॅटफॉर्मवरून विना-प्रिस्क्रिप्शन होणाऱ्या औषध विक्रीमुळे बनावट औषध निर्मिती, प्रतिजैविके (Antibiotics) आणि अंमली पदार्थांचा गैरवापर वाढल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोरोना काळात ऑनलाईन घरपोच औषध विक्रीसाठी दिलेली तात्पुरती सवलत आता रद्द करावी आणि ऑनलाईन फार्मा कंपन्यांसाठी कडक नियमावली लागू करावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.
​इमर्जन्सी सेवा सुरू:
दरम्यान, ऐन उन्हाळ्यात शहरातील संपूर्ण मेडिकल स्टोअर्स अचानक बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या गरीब रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची औषधांसाठी प्रचंड गैरसोय झाली असून, त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, बंद काळात कोणताही रुग्ण गंभीर आजारी असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासकीय ग्रामीण रुग्णालय (सरकारी दवाखाना), हिमायतनगर येथे इमर्जन्सी औषधोपचार आणि आवश्यक औषध पुरवठा उपलब्ध राहील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button