गुंज परिसरात चोरांचा हैदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील गुंज हे मोठे व्यापारी केंद्र असून परिसरात सधन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून गाव व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाहेरगावाहून विविध वस्तू विक्री करणाऱ्या वाहनांद्वारे काही अनोळखी व्यक्ती गावात येत असून त्या घरांची पाहणी व रेकी करत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. काही जण हात पाहणे, बुवाबाजी किंवा विविध कारणांनी घरांची माहिती घेत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा परिसरात आहे.
सध्या शेती हंगाम सुरू असून शेतकरी वर्ग बी-बियाणे, खत खरेदीसाठी तसेच धान्य व कापूस विक्रीचे पैसे घरी ठेवत असल्याने चोरट्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. संध्याकाळच्या वेळी बाहेरगावातील अनोळखी व्यक्तींची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्यावर कोणताही नियंत्रण अथवा चौकशी होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
परिसरात नियमित पोलिस गस्त वाढवून संशयित व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच गावातील नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास मोबाईलद्वारे फोटो किंवा माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, परिसरात वाढत असलेल्या अवैध धंद्यांमुळेही गुन्हेगारी वाढीस खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून पोलिस प्रशासनाने अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मण मोरे गुंजवासीयांकडून करण्यात येत आहे.



