भांब शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह; वनविभागाकडून तपास सुरु

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव वनपरिक्षेत्रातील भांब शिवारात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वनविभागासमोर बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी जनावरे चारण्यासाठी गेलेल्या इसमांना परिसरात दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता एका बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अंदाजे सात ते आठ दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर, वनपाल रविंद्र जाधव तसेच वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. डीएफओ शशांक कदम व एसीएफ ठमळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली.
वनविभागाने बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने मृत्यू झाला असावा, पाण्याअभावीअसा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.



