“४० लाखांच्या कामात माती, गंजलेले स्टील अन् दादागिरीचा खेळ?”

बंजारा तांड्यातील सिमेंट रोड व नाली बांधकामावर नागरिकांचा संताप; निकृष्ट काम तात्काळ बंद करण्याची मागणी
प्रवीण इंगळे, उमरखेड तालुका प्रतिनिधी. मो.7798767266
उमरखेड :
उमरखेड शहरातील बंजारा तांडा परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रोड, ट्रेन लादीकरण व नाली बांधकामातील कथित गैरव्यवहारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. तब्बल ४० लाख रुपयांच्या मंजूर निधीच्या कामात निकृष्ट साहित्य वापरून बोगस पद्धतीने काम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक सुजाण नागरिकांनी केला आहे.
सदर कामाचा कालावधी दिनांक २९ डिसेंबर २०२५ पर्यंत १८० दिवसांचा असताना प्रत्यक्षात मात्र कामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामामध्ये जुने, गंजलेले स्टील, तसेच नाल्यातील रेती, माती व निकृष्ट मिश्रण वापरून सिमेंट रोड व नालीवरील धाब्याचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात हे बांधकाम कोसळण्याचा किंवा तडे जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदारास “काम इस्टिमेटप्रमाणे आणि दर्जेदार करा, अन्यथा काम थांबवा,” अशी मागणी केली असता, संबंधित ठेकेदाराने दादागिरीची भाषा वापरून शिवीगाळ केल्याचा आरोपही समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, घटनास्थळी संबंधित इंजिनियर श्री. कुबडे उपस्थित असतानाही काम कथितरीत्या नियमबाह्य सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “प्रशासनाच्या डोळ्यादेखत निकृष्ट काम सुरू आहे का?” असा संतप्त सवाल आता परिसरातून उपस्थित होत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दारासिंग रुडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्वतंत्र तांत्रिक समिती नेमून कामाचा दर्जा तपासावा, चौकशी पूर्ण होईपर्यंत काम बंद करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे आता नगर परिषद प्रशासन या गंभीर आरोपांकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे संपूर्ण उमरखेडचे लक्ष लागले आहे.



