शहर

हिमायतनगरचा ‘विनाशकारी’ विकास! मजबूत सिमेंट रस्ते फोडून पाइपलाइन गाडली; पाणी नाही, फक्त खड्ड्यांचे साम्राज्य


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी):
नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हिमायतनगर शहराची, विशेषतः प्रभाग क्रमांक १३ ची मोठी दुर्दशा झाली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून तयार केलेले मजबूत सिमेंट रस्ते निर्दयीपणे फोडण्यात आले. पाइपलाइन टाकल्यानंतर हे रस्ते शास्त्रोक्त पद्धतीने न बुजवल्यामुळे सध्या संपूर्ण रस्त्यांचे रूपांतर ‘चिखलाच्या डबक्यात’ झाले असून, नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे.
​सिमेंट रस्ते फोडले, पण पाणी कुठे?
“नळाला थेंबभर पाणी नाही, मग आहे ते चांगले सिमेंट रस्ते फोडून जनतेला खड्ड्यात का घातले?” असा जळजळीत सवाल रहिवासी विचारत आहेत. योजना पूर्ण करण्याची कोणतीही शाश्वती नसताना घाईघाईत रस्ते फोडल्यामुळे शासनाच्या निधीचा दुहेरी अपव्यय झाला आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठीच हे रस्ते फोडले का? अशी चर्चा आता शहरात उघडपणे सुरू आहे.
​प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस
रस्ते खराब झाल्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. धुळीचे साम्राज्य आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या आणि भ्रष्ट धोरणामुळे शहराचा विकास होण्याऐवजी विनाशच अधिक होत असल्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button