आमदार निधीतील रस्ते कामात गैरप्रकाराचा आरोप; वसंत नगर तांड्यात चौकशीची मागणी

महागाव (प्रतिनिधी संजय नागरगोजे):
महागाव तालुक्यातील वसंत नगर तांडा, लेवा येथे आमदार निधीतून सुरू असलेल्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम व कमी प्रमाणात साहित्य वापरल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कॅनॉलपासून ते नथू राठोड यांच्या घरापर्यंत करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून, आवश्यक त्या प्रमाणात साहित्य न वापरता बोगस पद्धतीने काम पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा अपहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हे काम मंजूर करून घेण्यासाठी ठेकेदाराने एक लाख रुपये दिल्याची चर्चा परिसरात रंगत असून, त्यामुळेच कामाचा दर्जा घसरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याशिवाय, बांधकाम विभागाचे अधिकारी कामावर प्रत्यक्ष हजर नसताना काम सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंजूर इस्टिमेटनुसार काम होत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
या प्रकरणात बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित कामाची तात्काळ तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, महागाव तालुक्यात अशा प्रकारच्या बोगस कामांचा सुळसुळाट झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, प्रशासनाने लक्ष घालून पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



